नेपाळमधील पोखरा येथे लँडिंग करताना विमान जमिनीवर आदळले. त्यामुळे विमानाला अचानक आग लागली. विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. विमान अपघातात अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे विमान यति एअरलाईन्सचे असून हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. त्यावेळी विमान लँडिंग करताना जमिनीवर आदळले. अचानक विमानाला आग लागली. काही वेळातच आग भडकली. त्यामुळे या अपघातात काही जणांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नेपाळमधील जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तसेच पोलीस, विमान वाहतूक प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू असल्याने विमानतळ सध्या बंद आहे. तसेच या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हे विमान पोखराजवळ पोहोचले होते. मात्र, डोंगराळ भागात ही दुर्घटना घडली. विमान अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.