स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी घोषणा केली आहे. २०२३ मध्ये, आयोगाने तब्बल ८ हजार १६९ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा एकत्रित प्राथमिक परीक्षा २०२३ मधून एकूण ८,१६९ पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या वेबसाइटवर जाहिरात (क्रमांक 01/2023) प्रकाशित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राजपत्रित गट ब आणि क ची एकत्रित परीक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. ही परीक्षा राज्यातील ३७ जिल्ह्यांतील केंद्रांवर होणार आहे. याशिवाय, अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.
एमपीएससीमधील बहुतांश पदे राज्य सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये लिपिक आणि टंकलेखक पदासाठी भरली जाणार आहेत. लिपिक टंकलेखकांची ७ हजार ३४ पदे भरण्यात येणार आहेत. याशिवाय वित्त विभागातील कर सहाय्यक पदांच्या ४६८ जागा भरण्यात येणार आहेत. तर वित्त विभागाच्या तांत्रिक सहाय्यकासाठी एक जागा रिक्त आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गृह विभागातील उपनिरीक्षक पदाच्या ६ जागा भरण्यात येणार आहेत. सहाय्यक कक्ष अधिकार्यांचीही ७० पदे आहेत. त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील ८ पदांचाही समावेश आहे. याशिवाय वित्त विभागातील राज्य कर निरीक्षकाची १५९ पदे, गृह विभागातील पोलीस उपनिरीक्षकाची ३७४ पदे या भरतीतून भरण्यात येणार आहेत.